नागपूर -एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत कैद असलेल्या एका सुपारी व्यापाऱ्याला कारागृहातून सोडवण्याच्या बदल्यात 60 लाख रुपयांची सुपारी मागणाऱ्या चार आरोपींना नागपूर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात 30 लाख रुपयांचा व्यवहार हा हवाला मार्फत झाल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात सुपारी व्यापारी म्हणून ओळख असलेले महेशचंद्र नागरिया यांना मागच्या महिन्यात 27 जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत कैद असून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र यश मिळत नसल्याने कुटुंबीय निराश झाले होते. या संदर्भात काही आरोपींनी नागरिया यांचे इंदोर येथील भावाला संपर्क केला. तुमच्या भावाला कारागृहातून बाहेर काढायचे असेल तर आम्ही पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करू, त्यासाठी 60 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. भावाला जामीन मिळवून देण्याची हमी दिल्याने महेशचंद्र नागरिया यांनी 30 लाख रुपये दिले. मात्र ते पैसे हवाला मार्फत आल्याची माहिती पोलिसांना समजली आहे. दुसरीकडे महेशचंद्र नागरिया यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आरोपींनी उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी तगादा लावल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ करवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अजून फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींना 21 पर्यंत पोलीस कोठडी