महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्री सुनील केदार यांच्या आशीर्वादाने अवैध रेती उत्खनन सुरू, माजी आमदार आशिष देशमुखांचा आरोप - मंत्री सुनील केदार बातमी

कन्हान नदीवरील रेती घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन सुरू आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा आशीर्वाद आणि पाठबळाने हे सुरू असल्याचा आरोप, माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला आहे.

Former MLA Ashish Deshmukh
माजी आमदार आशिष देशमुख

By

Published : Aug 30, 2021, 8:06 PM IST

Updated : Aug 30, 2021, 9:39 PM IST

नागपूर -नागपूर जिल्ह्याच्या कन्हान नदीवरील रेती घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन सुरू आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा आशीर्वाद आणि पाठबळाने हे सुरू असल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाचे प्रदेश महासचिव तथा माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला आहे. या अवैध रेती उत्खननावर कारवाई करण्याची मागणी आशिष देशमुख यांनी हरित लवाद पुणे येथे तक्रार करून केली आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट नवीन आरोपांनी आणखी खळबळ निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यामुळे सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली होती. यात त्यांनी सरकारी वकिलांची बदली करून काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष यांची केलेली नियुक्ती रद्द करून उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

आशिष देशमुख यांचे पत्र

शासकीय नियमांना तिलांजली -

नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीच्या काठावरील अनेक रेतीघाट शासकीय नियम पायदळी तुडवत अवैधरित्या उत्त्खनन करत आहेत. नियमानुसार मान्सून सक्रिय झाल्यानंतर 10 सप्टेंबरपर्यंत उत्खनन केले जाऊ शकत नाही. पण यामध्ये 9 रेती घाट जे खासकरून मंत्री केदार यांच्या मतदारसंघातील येतात, यांचा उल्लेख त्यांनी तक्रारीत केला आहे. त्या घाटावर सर्रास उत्खनन केले जात असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. या भागातील रेती घाटावर मोठमोठ्या मशीन्सच्या साह्याने नदीपात्रातून रेती उपसा केला जात आहे. कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. या अवैध रेती घाटामागे सुनील केदार यांची काही लोकांसोबत भागीदारी आहे. त्यांच्याच आशीर्वादानेच हे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.

आशिष देशमुख यांचे पत्र

राजकीय वरदहस्तामुळे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष -

नागपूर जिल्ह्यातील महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी सुनील केदार यांच्या दबावात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर अधिकारी अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. यामुळेच ही तक्रार थेट नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलकडे केल्याचेही ते म्हणाले. सुनील केदार यांच्या विरोधात आपण कुठल्याही सूड भावनेने आरोप करत नाही. जे चूक आहे, जे नियमबाह्य आहे, त्या संदर्भात मी वेळोवेळी असे प्रकार उघडकीस आणेल, असे आशिष देशमुख म्हणाले.

मंत्री म्हणून पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही -

विशेष म्हणजे कन्हान नदीच्या काठावर अवैधरित्या सुरू असलेल्या रेती घाटाचे कालचे काही व्हिडिओही पुरावा म्हणून आशिष देशमुख यांनी नेशनल ग्रीन ट्रिब्यूनलकडे सादर केले आहेत. यामुळे अशाय गुन्हेगारी वृत्तीने भ्रष्टाचाराचा आरोप लागलेल्या व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात राहण्याच्या नैतिक अधिकार नाही, असेही माजी आमदार आशिष देशमुख 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

या प्रकरणासंदर्भात ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही. यामुळे या प्रकरणात त्यांची बाजू कळू शकली नाही.

Last Updated : Aug 30, 2021, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details