नागपूर - जगात भारताचे वाढलेले प्रस्थ पाहूनच चीनच्या पोटात दुखत असल्याने काल (मंगळवारी) चीनने भारताच्या सैन्यावर हल्ला केल्याचा निष्कर्ष सैन्याचे माजी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी काढला आहे.
'जगात भारताचे वाढते प्रस्थ हेच चीनच्या पोटदुखीचे कारण' - माजी कर्नल अभय पटवर्धन कालच्या (मंगळवारी) संघर्षाचे मूळ हे चीनचा विस्तारवाद आहे. चीन जगाला दाखवू इच्छितो की, भारत वाटतो तितका बलवान नाही. मात्र ज्या प्रकारे काल भारताने चीनला प्रतिउत्तर दिले आहे, त्यातून चीनला भारताच्या सैन्य क्षमतेची जाणीव झाली असावी, असे ते म्हणाले.
लडाखच्या सीमेवर चीनच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवानांसह एका अधिकाऱ्याला वीरमरण आले. चीनचे ४२ सैनिक यामध्ये जखमी झाले. यामध्ये मृतांचा देखील समावेश आहे.
कोरोनामुळे जगात उघडा पडलेला चीन भारतावर दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहे. भविष्यात भारत जागतिक संघटनेमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार आहे. चीन हा साम्राज्यवादी आणि विस्तारवादी देश आहे. जगात भारताची वाढती प्रतिष्ठा आणि इतर देशांसोबत निर्माण झालेली जवळीक यामुळे भविष्यात अनेक ऑर्गनायझेशन्समध्ये भारताला स्थान मिळणार असल्याने चीनला हे बघवत नाहीय. यामुळे हताश होऊन चीनने ही भूमिका घेतल्याचे ते म्हणाले.
भारताने तो हल्ला परतून लावत आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. भविष्यात दोन्ही देशांना युद्ध परवडणारे नाहीय. त्यामुळे या कुरघोडी चीन सतत करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कालच्या घटनेनंतर चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातून समाधानकारक तोडगा निघण्याची आशा निवृत्ती सैन्य अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलीय.