नागपूर -"मी यापूर्वी कधीही सुरक्षा घेतली नव्हती. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. प्रदेशाध्यक्ष असतानासुद्धा साधा एक सुरक्षारक्षक नव्हता. मुख्यमंत्री झाल्यानंतर मला सुरक्षा देण्यात आली होती. मी घाबरत नाही, मी विना सुरक्षेनेसुद्धा फिरू शकतो, असे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'कुठलीही अडचण नाही'
सुरक्षा कमी झाल्याने फिरण्यात कमी किंवा फरक पडणार नाही. मी जनतेचा माणूस आहे, जनतेत राहून काम करणार, मला कुठलीही अडचण नसल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते नागपुरात त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.
'थ्रेट परसेप्शनवर ठरते'
याकूब मेनन आणि नक्षलवादी कारवायानंतर केंद्र सरकरच्या सुरक्षा यंत्रणेकडून काही इनपुट मिळाले. त्या अनुषंगाने सुरक्षेत वाढ करण्यात आली. तसेच इनपुट हे मागील वर्षी सुद्धा देण्यात आले होते. यामुळे सुरक्षा देण्यात आली होती. परंतु या सरकारला असे वाटत असेल की थ्रेट परसेप्शन नाही. यामुळे सुरक्षा कमी केली, यात मला काही अडचण नाही. सुरक्षा द्यायची की नाही हे थ्रेट परसेप्शनवर ठरते.
'हरकत नाही, मात्र..'
दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यात अनेकांची सुरक्षा कमी करण्यात आली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची झेडप्लेस सुरक्षा कमी करण्यात आली. यावर त्यांनी माझी सुरक्षा कमी केल्यावर काही हरकत दर्शवली नाही. मात्र यावर बोलताना अनेकांना थ्रेट परसेप्शन नसतांना सुरक्षा दिली जात असल्याचे म्हणत त्यांनी टोला लगावला.