नागपूर - मेळघाटातील हरिसाल येथील वन अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला अखेर नागपुरातून अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
रेड्डीला घेऊन पोलीस अमरावतीला रवाना
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होता. बुधवारी दुपारपासून त्याचे लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले. नागपूर गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केल्यानंतर तो एका हॉटेलजवळ दिसून येताच पोलिसांनी त्याला अटक केली. नागपूर पोलिसांनी कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक रेड्डीला अमरावतीला घेऊन गेले आहे.