नागपूर -उड्डाण क्लबला ( Nagpur Flying Club ) गौरवशाली परंपरा असून हा क्लब पुनरुज्जीवित झाल्यामुळे विदर्भातील युवकांना विमानउड्डाण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी व्यक्त केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या नागपूर उड्डाण क्लबच्या हॅंगरमध्ये वैमानिक प्रशिक्षणाचे उदघाटन आदित्य ठाकरे यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे -
नागपूर उड्डाण क्लब हा पुनरुज्जीवित होवून प्रशिक्षणासाठी पुन्हा उपलब्ध झाला आहे. मध्य भारतातील सर्वात गौरवशाली असलेला हा क्लब भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा कार्यान्वित होत असल्याचे सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या क्लबच्या माध्यमातून नागपूरसह विदर्भातील युवकांना विमान उड्डाणाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना हा क्लब बळ देणार असून या क्षेत्रात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी नवे दालन खुले झाले आहे आणि युवक सुद्धा भरारी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.
अशी आहे फ्लाईंग क्लबची माहिती -
नागपूर उड्डाण क्लब वैमानिक प्रशिक्षणासाठी सज्ज असून क्लबकडे प्रशिक्षणासाठी चार विमाने आहेत. या क्लबने आतापर्यंत देशाला बरेच वैमानिक दिले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच युवकांची या क्षेत्रातील आवड लक्षात घेता, वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. या क्लबमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएडीसीने 5.97 एकर जागा नवीन हँगर बांधकामासाठी उपलब्ध करून दिली असून यामध्ये मल्टीइंजिन विमान, दोन सी-प्लेन, हेलिकॉप्टर आणि सिम्युलेटर ठेवण्याचादेखील प्रस्ताव आहे.