महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उच्च शिक्षित समाजाला हुंड्याची कीड; ५० लाखांच्या मागणीला कंटाळून विवाहित डॉक्टर महिलेची आत्महत्या

हुंड्याची मागणी करत डॉक्टर पतीकडून पत्नीचा छळ केला जात होता. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर डॉक्टर असलेल्या त्या विवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे.

doctor
५० लाखांच्या मागणीला कंटाळून विवाहित डॉक्टर महिलेची आत्महत्या

By

Published : Dec 24, 2020, 1:57 PM IST

Updated : Dec 24, 2020, 2:26 PM IST

नागपूर- शहरातील नरेंद्र नगरच्या उपेंद्र अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीला कंटाळून या डॉक्टर महिलेने स्वत:चे आयुष्य संपवले असल्याची माहिती समोर आली आहे. रुची मंगेश रेवतकर असे गळफास घेतलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे महिलेचा पती देखील डॉक्टर मंगेश रेवतकर असे त्यांचे नाव आहे. रुची यांना माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता, अशी तक्रार रुची यांच्या आईने केली आहे. या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

५० लाखांचा तगादा

२०१६ मध्ये रुची आणि मंगेश यांचा विवाह संपन्न झाला होता. व्यवसायाने दोघेही डॉक्टर असल्याने त्यांचा संसार सुखाचा होईल, असे स्वप्न रुचीच्या आई वडिलांच्या बघितले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच मंगेश ने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. मंगेशने रुचीला माहेरुन पैसे आणण्यासाठी अनेक वेळा भाग पाडले होते. सुरुवातीला छोटी-मोठी नड असल्याचे समजून रुचीच्या आई वडिलांनी त्यांच्या मागण्यापूर्ण केल्या. त्यानंतर रुचीला मुलगा झाल्यानंतर नवऱ्याकडून त्रास होणार नाही, या आशेवर तिने पुन्हा संसाराला सुरुवात केली. मात्र मंगेश मधील लालचीपणा आणखीच वाढला होता. तो रुचीचा माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी सारखा त्रास देत होता. मारहाण देखील करायचा, हे प्रकार तब्बल चार महिने सुरू होते.

विवाहित डॉक्टर महिलेची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी आईला फोन-

घटनेच्या दिवशी सुद्धा आरोपीने डॉक्टर रुचीला पैशासाठी मारहाण केली होती. त्यावेळी रुचीने तिच्या आईला फोन करून सर्व घटनाक्रम सांगितला. तेव्हा तिने मला इथून घेऊन जा, नाही तर आज माझ्या जिवाला धोका असल्याचे संगितले होते. हा फोन झाल्याच्या १५ मिनिटांनी रुचीने आत्महत्या केल्याचीच बातमी त्यांच्या कानी पडली.

सुसाईडनोटमध्ये अत्याचाराचा उल्लेख-

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, पोलिसांना त्याठिकाणी एक सुसाईड नोट आढळून आली आहे. ज्यामध्ये तिच्यावर सुरू असलेल्या अत्याचाराचा सविस्तरपणे उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर रुचीची आई अल्का सुरेश कवडे यांनी पोलीस ठाण्यात हु़ंडाबळीची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून मंगेश रेवतकर विरुद्ध हुंड्याकरिता पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

सुसंस्कृत समाजाला हुंड्याची कीड

आपला समाज शिक्षित होतो आहे. अनिष्ट चालीरीतींना मूठमाती दिली जात आहे. मात्र अजूनही हुंड्या करिता पत्नीचा छळ करण्याच्या संतापजनक घटना आपल्या सुसंकृत समाजामध्ये सातत्याने घडत आहेत. नवरा आणि बायको डॉक्टर असल्याने दोघांचा पगार समाधानकारक होता,मात्र बायकोने माहेरून पैसे आणावे आणि त्या भरवश्यावर स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करणारे विकृत मानसिकतेचे उच्च शिक्षित असले तरुण समाजाला लागलेली कीड आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही. आज रुचीची आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा या करिता संघर्षाची पहिली पायरी चढली आहे,मात्र समाजात अश्या अनेक रुची होऊन गेल्या आहेत,त्यांच्यावर झालेला अन्यायाचा आवाज चार भिंतीच्या आताच दफन झाला झाला आहे,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही ही आपल्या उच्च शिक्षित समाजाची शोकांतिका आहे


Last Updated : Dec 24, 2020, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details