नागपूर - शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एक वृद्ध इसमाला फेसबुक एका महिलेशी झाली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. मी भारतात आलेली आहे, पण माझ्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याने मला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून मला माझी सोडवणूक करण्यासाठी दहा लाखांची गरज असल्याचे सांगून त्या महिलेने वृद्ध इसमाची फसवणूक केली आहे. या संदर्भात शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण घटनाक्रम गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी घडला आहे, मात्र त्याची तक्रार आता दाखल झाल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारांचा शोध घेणे कठीण होऊन बसले आहे. पोलिसांनी त्या वृद्ध इसमाची ओळख सांगायला नकार दिला आहे.
अशी झाली फसवणूक
सुमारे वर्षभरापूर्वी त्यांची ओळख फेसबुकवरून लीडा थॉमसन नामक एका महिलेशी झाली होती. त्या महिलेने मी लंडन येथील नागरिक असल्याचे सांगितले होते. सुमारे वर्षभर फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते, दरम्यान त्या महिलेने भारतात फिरायला येणार असल्याची माहिती तक्रारदाराने दिली. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी त्या महिलेने तक्रारदारांना संपर्क केला आणि मी भारतात आले असून माझ्याजवळ मोठ्या प्रमाणात रोकड आल्याने मला कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. कस्टम ड्युटीकरिता ९ लाख ८५ हजारांची गरज असल्याचे तिने सांगितले. तक्रारदाराला खरे वाटावे, म्हणून त्या महिलेने कस्टम अधिकारी म्हणून एका इसमाशी बातचीतदेखील करवून दिली होती. महिलेच्या बोलण्यावर त्या वृद्ध इसमाने विश्वास ठेवून तत्काळ १० लाख रुपये त्या महिलेच्या खात्यात वळतेदेखील केले होते. त्यानंतर मात्र ज्यावेळी त्या महिलेने तक्रारदाराला टाळायला सुरवात केली, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी बजाज नगर पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.