नागपूर - गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आतापर्यंत विविध विलगीकरण कक्षात असणाऱ्या रूग्णांच्या जेवणावर तब्बल ८५ लाख रूपये खर्च झाल्याची माहीती पुढे आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे ही माहिती मागितली होती. यात ही आकडेवारी समोर आली आहे.
शहरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा थक्क करणारा आहे. दररोज अनेक रुग्णांची नोंद होत आहे. अशातच गेल्या तीन महिन्यांपासून विलगीकरण कक्षेत ठेवण्यात आलेल्या रुग्णांसाठी महानगर पालिकेकडून फक्त जेवणावर तब्बल ८५ लाख रुपये खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय आतापर्यंत प्रत्येक दिवसासाठी हा खर्च ८८ हजाराच्या घरात असल्याचे समोर आले आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मनपाच्या आरोग्य विभागाकडे माहिती अधिकारच्या माध्यमातून ही माहिती मागीतली होती. विशेष म्हणजे १ मे पासून विलगीकरणातील रुग्णांची संख्या लक्षात घेता आणि रुग्णांच्या दोन वेळचे जेवण विचारात घेता. ही आकडेवारी संभ्रमित करणारी असल्याचे अभय कोलारकर यांनी सांगितले.