नागपूर : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांनी तातडीने जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. आपल्या आईच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी हा अर्ज केला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे.
साईबाबा हे सध्या नागपूर सेंट्रल जेलमध्ये आजीवन कारावास भोगत आहेत. माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा झाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यातही त्यांनी यासाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळला गेला. त्यानंतर आता पुन्हा, अंतिम संस्कारानंतरच्या विधी पार पाडण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. तसेच, याआधी त्यांची आणि त्यांच्या आईची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भेट घडवून देण्यासाठीही याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र तीदेखील फेटाळण्यात आली होती.