नागपूर -आपल्या भारतीय संस्कृतीमधील महत्वाचा उत्सव म्हणजे दसरा, असत्यावर सत्याचा विजय म्हणून देखील विजयादशमीकडे पाहिले जाते. दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण भारतात रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सण आणि उत्सवांच्या प्रमाणे रावण दहनाच्या कार्यक्रमावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे रावण तयार करणाऱ्या कलाकारांवर सुद्धा आर्थिक संकट ओढवले आहे.
'रावण' द्यायचा रोजगार, मात्र कोरोनामुळे त्याचाही झाला नाईलाज मध्य भारतात गेल्या पाच पिढ्यांपासून रावणाचा पुतळा तयार करणाऱ्या बिनवार परिवाराचा मुख्य व्यवसाय रावण निर्माण करणे हाच आहे, फक्त नागपूरच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, मुंबई दिल्ली ला देखील बिनवार यांनी बनविलेल्या रावणाचे दहन केले जाते. मात्र, यंदा रावण दहन नसल्याने त्यांच्य समोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी तर रोजगार हवा मात्र इतर व्यवसाय केला तर ही रावण पुतळा बनविण्याची ही कला मध्य भारतातून लुप्त होईल या भीतीने अद्यापही हेच काम करत असल्याच्या भावना अमर बिनवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
आजोबांकडून मिळाला वारसा
अमर बिनवार यांनी वडील आणि आजोबांकडून मिळालेला वारसा जपलेला आहे. आज वयाच्या ४२ व्या वर्षी अमर यांनी परंपरा जपण्याच्या उद्देशाने हातच काम बाजूला सारून काही प्रतिकात्मक म्ह्णून रावणाचे पुतळे तयार केलेले आहेत. त्याला अद्यापही मागणी आलेली नाही. अवघ्या काही तासांवर रावण दहनचा मुहूर्त आहे. मात्र, हे पुतळे या वर्षी विकले जाणार नाहीत. याची सुद्धा त्यांना जाणीव आहे. केवळ कला आणि कलाकार जीवंत राहवा याच प्रामाणिक उद्देशाने त्यांनी तयार केलेल्या मूर्तींना रावणाचे रूप दिले आहे. प्रत्येक वर्षाला रावणाच्या पुतळे तयार करण्याचे ऑर्डर वाढतच होते. गेल्या वर्षी तर रावणाचे तब्बल १६ मोठे पुतळे विकण्यात आले होते. दरवर्षी चांगली मागणी असायची. मात्र, यावर्षी सारेच ठप्प झाले आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत राज्य सरकार सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, अद्यापही कोरोनाचे संकट टळले नसल्याने परवानगी देणे शक्य नसल्याची जाणीव देखील त्यांना आहे. सरकारने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळत असताना सरकारने परंपरेचे जतन म्हणून काम करणाऱ्या कलाकारांना मदत मिळावी या करता ठोस पावलं उचलण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.