नागपूर- जापनीज मेंदू ज्वराचे विदर्भात 8 रुग्ण आढळून आलेत. तसेच यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिली आहे. चंद्रपूरमध्ये 4, गडचिरोली 2, भंडारा 1 तर वर्ध्यात 1 जापनीज मेंदू ज्वराचा रुग्ण आढळला आहे.
विदर्भात आढळले जापनीज मेंदू ज्वराचे आठ रुग्ण काय आहेत जापनीज मेंदू ज्वराची लक्षणे-
जापनीज मेंदू ज्वर हा 'जापानी अॅक्यूट एन्सेफलायटिस' या वायरस मुळे होतो. हा वायरस प्रामुख्याने पाळीव डुक्कर आणि जंगली पक्षांमध्ये असतो. या वायरसचे संक्रमण धान शेतात आढळणाऱ्या क्युलेक्स ट्रायटेनियरहिंचस समूहाच्या डासांमध्ये होतो. हा डास मानवाला चावल्यास मानवी शरीरात अॅक्यूट एन्सेफलायटिस वायरस येतो. त्यामुळे व्यक्तीला जापनीज मेंदू ज्वराची लागण होते. यामध्ये ताप येणे, झटके येणे, असंबंध बोलणे, उलटी येणे, चक्कर येणे आणि शुद्द हरपणे अशाप्रकारची लक्षणे आढळून येतात.
या संबंधी लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. हा संसर्गजन्य रोग नसून डासांच्या संक्रमनामुळे होतो. त्या करिता नियंत्रणात्मक उपाययोजना करने महत्वाचे असून डासोत्पत्ती स्रोत कमी करणे, तसेच डासांच्या घनतेवर नियंत्रण ठेवून विषाणूंचा प्रसार रोखता येतो, अशी माहिती डॉ. गणवीर यांनी दिली.