नागपूर : पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनातील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आणि हेल्दी पोलिसिंग व्हावी यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( CP Amitesh Kumar ) यांनी अनोखी संकल्पना आणली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ज्या कर्मचाऱ्याला ज्या विभागात, ज्या पोलीस ठाण्यात नियुक्ती हवी असेल त्या ठिकाणी त्यांची बदली केली जात आहे. आवडत्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्यास त्याचा चांगला परिणाम हा त्यांच्या कामात दिसून येतो, अशी धारणा या संकल्पनेमागे आहे. अवघ्या तीन तासात साडे आठशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या समोरासमोर, कोणत्याही शिफारशी शिवाय आणि अर्थपूर्ण व्यवहार न होता झाल्याने पोलीस कर्मचारी वर्ग आनंदी झाला ( Nagpur Police Transfer ) आहे. पोलिस दलातील बदल्यांमध्ये आता एक छोटा मात्र अत्यंत सकारात्मक बदल पाहायला मिळतो आहे. कारण नागपुरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आली आहे.
बदल्यांसाठी अनोखी संकल्पना : केंद्रीय कर्मचारी असो की राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये कार्यरत नोकरदार वर्ग, प्रत्येकाला आवडत्या ठिकाणीचं बदली पाहिजे असते. मात्र, बदलीवरून नेहमीचं होणारे भ्रष्ट्राचाराचे आरोप हे काही नवीन नाहीत. मधल्या काळात तर पोलिसांच्या बदल्यांवरून राज्याचे राजकारण सुद्धा ढवळून निघाले होते. आवडत्या ठिकाणी बदली न मिळाल्यास तो कर्मचारी मानसिक तणावात रहातो. ज्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कामावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. ही बाब हेरून नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नवी संकल्पना अस्तित्वात आणली आहे. एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पोलिसांच्या बदल्यांवरून सुरु झालेले वादंग थांबायची चिन्हे नसताना नागपुरात पोलिसांच्या बदल्यांसाठी राबवलेला पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.