नागपूर- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषत: विदर्भातील नागपूरसह बहुतांश जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागपुरातील शाळा महाविद्यालये, आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राऊत यांनी जाहीर केला आहे.
नागपुरात कोरोनाच्या संक्रमणात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बध कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहरासह जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून कडक निर्बंध लागू केले आहेत.
या निर्बंधांची होणार अंमलबजावणी
- आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद
- मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद
- 7 मार्च पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद राहतील
- हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील
- सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्च पर्यंत बंद राहतील
- मंगल कार्यालय 25 फेब्रुवारीनंतर 7 मार्च पर्यंत बंद राहणार
- 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल; मंगल कार्यालयमध्ये 7 मार्च पर्यंत लग्न होणार नाहीत
- बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार
- नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार.