नागपूर- भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणणारे वकील सतीश उके यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. वकील सतीश उके यांना सकाळी ताब्यात घेतल्यानंतर दिवसभर ईडी अधिकाऱ्यांनी सेमिनरी हिल्समधील सीजीओ कार्यालयात चौकशी केली आहे. वकील सतीश उके व त्यांच्या भावाला अटक केली आहे.
आता उके यांना नागपूर जिल्हा विशेष न्यायालयात नेण्यात येणार आहे. ईडीचे अधिकारी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळविण्याचा ईडी अधिकाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. वकील सतीश उके आणि त्याच्या भावाला विमानाने मुंबईला रात्री नेण्याची शक्यता आहे.
पहाटेच घरावर टाकला छापा-
भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांवर विविध आरोप करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणारे काँग्रेस पुरस्कृत वकील सतिश उके यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज पहाटे अमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या पथकाने छापा टाकला आहे. ईडीने दोघांची पाच तास चौकशी केली. त्यानंतर त्याचा भाऊ प्रदीप आणि त्यांना ताब्यात घेऊन नागपूर ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. पथकाने सतीश उके यांचा मोबाईल आणि लॅपटॉप सुद्धा जप्त केला आहे. पथकात सुमारे दहा ते 12 अधिकारी ईडीच्या पथकात सहभागी असून यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं बोललं जातं आहे. ईडीने छापा टाकताच सीआरपीएफच्या जवानांचा बंदोबस्त उकेच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे.