नागपूर -कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेकडून रुग्णालय तयार करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून 18 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. सध्या खाटा मिळत नसल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत तर दुसरीकडे पाच कोविड सेंटरमधील सुमारे पाचशे खाटा धूळ खात पडल्या आहेत.
महानगरपालिकेच्या 'त्या' रुग्णालयात 500 खाटा अजूनही धूळखात शहरात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. अशावेळी महानगरपालिकेकडून रुग्णालयांसाठी धडपड केल्याचे दाखविल्या जात आहे. मात्र, कोरोनाग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या 5 रुग्णांलयातील 500 खाटा धूळ खात पडल्या आहेत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात या पाच रुग्णालयांची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आली होती. या रूग्णालयांसाठी 18 लाख रुपये इतका खर्चही करण्यात आला आहे. पण, सद्यस्थिती पाहता या रुग्णालयातील खाटा अक्षरशः धूळ खात पडल्या आहेत.
शहरातील सदर भागात असणाऱ्या आयुष रुग्णालयात सुमारे शंभर खाटांची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी अत्याधुनिक साहित्यही बसविण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यापासून हे रुग्णालय बंदच आहेत. तर दुसरीकडे खाटांअभावी शहरातील नागरिकांचे मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेले 'ते' रुग्णालय कोणत्या उपयोगाचे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागपूर महानगरपालिकेचे गलथान कारभार पुढे आले आहे. कोरोनाच्या परिस्थितीशी लढायला ही यंत्रणा तयार करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य माणसांना याचा फटका बसत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे या गंभीर स्थितीला प्रशासन कशा पद्धतीने हाताळणार हे पाहणे महत्वाचे आहे.
हेही वाचा -नागपुरात रेती माफियांचा उच्छाद; पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल