नागपूर -गेल्याच महिन्यात पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर नामक तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना अगदी ताजी असताना अशाच प्रकारची एक घटना पुन्हा नागपुरात घडली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका व्यक्तीने पोलिसांनी मारहाण केली म्हणून आत्महत्या केली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. महेश राऊत असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
आत्मसन्मान दुखवल्याने तरुणाने केली आत्महत्या काय आहे प्रकरण?
मृतक महेशच्या घराच्या शेजारी दोघांमध्ये भांडण सुरू होते. या बाबत महेश राऊत यांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरवर फोन करून सूचना दिली होती. त्यानंतर महेश आपला फोन चार्जिंगवर लावून भांडण सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते. माहिती कक्षाला भांडणाची माहिती वायरलेसवरून हुडकेश्वर पोलिसांना दिली असता प्रवीण आलम आणि किशोर शिराळे नामक दोन बिट मार्शल घटनास्थळी जाण्यासाठी रवाना देखील झाले. मात्र घर शोधण्यात अडचणी येत असल्याने त्या बिट मार्शल पोलीस कर्मचाऱ्यांनी महेशला वारंवार फोन केले. मात्र महेश फोन चार्जिंगला लावून घरा बाहेर सुरू असलेल्या भांडणाच्या ठिकाणी गेला असल्याने त्यांनी फोन स्विकारला नाही. जो पर्यंत बिट मार्शल घटनास्थळी पोहचले तोपर्यंत वाद देखील मिटला होता. त्यामुळे बिट मार्शल प्रवीण आलम आणि किशोर शिराळे यांनी शंभर नंबरवर कॉल करणाऱ्या महेशकडे कॉल संदर्भात विचारणा केली. मात्र महेशने दिलेल्या उत्तरावर ते बिट मार्शल समाधानी झाले नाही. त्यामुळे संतापलेल्या बिट मार्शलने महेशला लोकांच्या समोरच जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान दुखवला गेला. त्यामुळे त्यांनी सुसाईड नोट लिहिल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
नागरिकांमध्ये रोष
महेश राऊत यांनी भांडण सुरू असल्याने त्यातून अप्रिय घटना घडू नये, या उद्देशाने एक जागरूक नागरिक असल्याचे कर्तव्य पूर्ण केले होते. मात्र पोलिसांनी त्यांना विनाकारण मारहाण केल्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला. त्यामुळेच महेश यांना आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असल्याचा आरोप करत नागरिकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याला घेराव घालत आपला रोष व्यक्त केला आहे. संतप्त नागरिकांची संख्या लक्षात घेता परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कर्मचारी दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
ज्या ठिकाणी दोन्ही बिट मार्शल यांनी महेश राऊत यांना मारहाण केली होती. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तापसण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये नागरिकांनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई केली जाणार आहे.