नागपूर -राज्यात आणि नागपूर जिल्ह्यात कोरोना आणि ओमायक्रॉन ( Omicron Increased In Maharashtra ) बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागपूरकरांना पुन्हा एकदा कोविड निर्बंधांसह ( Covid Restriction In Nagpur ) दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागणार आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान प्रशासनाकडून ज्या पध्दतीने कारवाई केली जायची, त्याचप्रमाणे पुन्हा नव्याने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळातही बेफिकीरने वागणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा केली जाणार आहे.
गर्दी कमी करण्याचे निर्देश -
प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार ताकीद देऊन सुद्धा बाजारपेठेतील गर्दी अजूनही कमी झालेली नाही, किंबहुना थोडी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा पाचशे झाली असताना ओमायक्रॉन रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्यास पुन्हा रुग्ण संख्येचा स्फोट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत असून लग्नकार्य, कार्यक्रम, सोहळे, तेरवी या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गर्दी कमी होईल याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांनी एक घेतला असेल त्याने तातडीने आपला दोन डोस पूर्ण करावा, स्वतःला सुरक्षित करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय वाढती रुग्ण संख्या बघता सर्व प्रमुख हॉस्पिटलमधील पूरक यंत्रणा तयार ठेवण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहे.