नागपूर - राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतील असे भाकीत राजकीय विश्लेषक करत आहेत. असे असले तरी नागपूर महानगरपालिकेची २०२२ मध्ये होणारी निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी मागणी आता काँग्रेस नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीदेखील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आता राज्याच्या सत्तेतील समीकरण नागपूर महानगरपालिका निवडणुकीत कायम राहणार की भाजपाच्या गडात स्वबळाचा प्रयोग केला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माहिती देताना काँग्रेसचे महासचिव संदेश सिंगलकर हेही वाचा -'स्वतःच्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी ठाकरे सरकार सीबीआयला नो एन्ट्री करत आहे'
नागपूर महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून सव्वा वर्षांचा वेळ शिल्लक आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आतापासूनच कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा आदेश दिला होता. यानंतर आता हीच मागणी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनीसुद्धा करायला सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित यश हे नागपूर शहरात मिळाले होते. सहा पैकी दोन जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या होत्या. त्याचाच फायदा महानगरपालिका निवडणुकीत होऊ शकतो, असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. २०१७ च्या तुलनेत आजच्या घडीला काँग्रेस मजबूत दिसत असल्यानेच निवडणुकीपूर्वी युती होऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.