नागपूर-शहरातील कोरोनाचा तिसरा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या नाईक तलाव परिसरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच स्थानिकांनी मोठी पार्टी केल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला होता. मात्र, हा दावा नागपूर पोलिसांनी फेटाळून लावला आहे. नाईक तलाव परिसरात ती "बिर्याणी पार्टी" झालीच नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यासंदर्भांत सखोल चौकशी आणि नाईक तलाव परिसरातील अनेकांचे जबाब नोंदवल्यानंतर असा पोलिसांनी हे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि पोलिसांमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपुरात 'ती' पार्टी झाली नाही, पोलिसांचा दावा; मनपा आयुक्तांबरोबरचे मतभेद उघड - तुकाराम मुंढे न्यूज
कोरोनाच्या उद्रेकासाठी नाईक तलाव परिसरात झालेली तथाकथित बिर्याणी पार्टी जबाबदार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तपासानंतर अशी पार्टी झालीच नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागपूर शहरात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनाच्या उद्रेकासाठी नाईक तलाव परिसरात झालेली तथाकथित बिर्याणी पार्टी जबाबदार असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली होती. ज्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीने पार्टी केली, असे सांगितले गेले तो 26 मे ते 5 जून या काळात मेयो रुग्णालयात दाखल होता. त्या व्यक्तीने पार्टी आयोजित करण्याचा किंवा त्यात सहभागी होण्याचा प्रश्नच नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे. जे लोक पार्टीत सहभागी झाल्याबद्दल सांगितले गेले, ते ही त्या काळात रुग्णालय किंवा विलगीकरण केंद्रात होते. त्यामुळे त्यांच्याही पार्टीत सहभागी होण्याबद्दलची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे.
पोलिसांनी नाईक तलाव परिसरात इतर नागरिकांचे ही जबाब नोंदवले आहेत. त्यांनी ही अशी पार्टी झाली नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे डीसीपी राहुल माकणीकर म्हणाले. या प्रकरणी महापलिकेतून काहींनी खोटी माहिती पसरवली का, याचा तपास करणार असून तसे काही समोर आल्यास कायदेशीर कारवाई करू, असे पोलिसांचे म्हणणे आहे.