नागपूर - बदलत्या काळासोबत गणेशोत्सव साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीत देखील बदल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा व्हावा हे प्रत्येकालाच वाटायला लागले आहे, त्यामुळे आता यादृष्टीने गणेश भक्तांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, यावर्षी सर्वच उद्योग-धंद्यांवर कोरोनाचे सावट आहे, त्यातून मूर्तिकार देखील सुटलेले नाहीत. शाडू मातीच्या मूर्तींचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्यांची वाढल्याने नागपुरात पितळेच्या गणपती मूर्तिंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायमस्वरूपी बाप्पाची मूर्ती आपल्या घरात असावी या भावनेतून सुद्धा गणेश भक्त पितळी बाप्पाच्या मूर्तींना पसंती देत आहेत.
बाप्पांचा आगमनाची उत्सुकता सगळ्यांनात असते. मात्र, दहा दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर अखेर बाप्पांना निरोप द्यवा लागतो. विघ्नहर्त्याच्या विसर्जनामुळे पाणी प्रदूषित होऊन पाण्यात राहणाऱ्या जीवांवर विघ्न येतात. त्यामुळे आता पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. शाडू मातीच्या आणि पीओपी मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होऊ लागल्याने गणेशोत्सव साजरा करण्याची पारंपरिक संकल्पना बदलायची गरज निर्माण झाली आहे. १० दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर ती मूर्ती तलावात किंवा नदीत विसर्जीत केल्यानंतर मुर्तीचे भग्नावशेष बघवल्या जात नसल्याने, प्रत्येक गणेश भक्ताच्या भावना दुखावल्या जातात. यावर उपाय म्हणून आता अनेकांनी बाप्पांच्या मूर्तींंचे विसर्जन करणे टाळले आहे.