नागपूर -पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा व्हावा हे आता अनेकांना वाटायला लागले आहे. यामुळे आता त्यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात झाली असल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. शाडू मातीच्या मूर्तीचे दर प्रचंड वाढल्याने नागपुरात यावर्षी पितळेच्या गणेश मूर्तीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्राहक सुद्धा त्याला चांगली पसंती देत आहेत.
नागपूरकरांची पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या दिशेने वाटचाल; माती ऐवजी कायमस्वरूपी पितळी मूर्तींना प्राधान्य
धार्मिक उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न नागपूरकर करत आहेत. यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात पीओपी किंवा मातीच्या मूर्तीच्या जागेवर पितळी गणेश मूर्तींची स्थापना करण्यावर नागपूरकरांचा भर आहे.
गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. यामुळे हा वारसा जतन करताना पर्यावरणाचा संतुलन साधने आवश्यक आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान, बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता लहानांपासून वृध्दांपर्यंत सगळ्यांनाच असते. मात्र, दहा दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर अखेर बाप्पांना जड अंतकरणाने निरोप द्यावा लागतो. विघ्नहर्त्याच्या विसर्जनामुळे पाणी प्रदूषित होऊन पाण्यात राहणाऱ्या जीवांवर विघ्न येतात. त्यामुळे आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. शाडू मातीच्या आणि पीओपी मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होऊ लागल्याने गणेशोत्सव साजरा करण्याची पारंपरिक संकल्पना बदलायची गरज निर्माण झाली आहे.
10 दिवस बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर ती मूर्ती तलावात किंवा नदीत विसर्जित केली जाते. यानंतर त्या मूर्तीचे भग्नावशेष बघवले जात नाहीत. यामुळे प्रत्येक गणेश भक्ताच्या भावना दुखावल्या जातात, यावर उपाय म्हणून आता अनेकांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करणेच टाळले आहे. या पेक्षाही एक पाऊल पुढे जात अनेकांनी तर आता पितळी मूर्तींना प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. पितळ या धातूला शुद्ध धातू म्हणून समजले जाते. म्हणूनच पितळेपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींना ग्राहक पसंती देत आहेत. त्यामुळे पितळेच्या मूर्तीची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली असून छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तींना देखील बाजारात मोठी मागणी मिळत आहे. पितळीचा बाप्पा आल्याने वर्षभर बाप्पा आपल्यासोबत राहतो याचा आनंद तर असेलच. यासोबत धार्मिक उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे नुकसान न केल्याचे मानसिक समाधान देखील यातून मिळणार असल्याचे भक्त सांगतात.