नागपूर - शहरात एका 'जरा हटके' अशा लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. एरवी नवरदेव घोड्यावरून वरात घेऊन लग्नमंडपात येतो. मात्र, या लग्नात नवरीच घोड्यावरून लग्नमंडपात दाखल झाली. एवढच नाही तर, नवरी बाईंनी 'लय खास' अंदाजात घोड्यावर 'डान्स'ही केला. यानंतर मात्र, वरातीत आणि परिसरात या लग्नाची चर्चा झाली नसती तर हे नवलच.
आपले लग्न इतरांच्या लग्नापेक्षा कसे वेगळ करता येईल हा प्रयत्न वधू-वर करत असतात, असाच एक प्रयत्न नागपुरात एका 'वधु'ने केला आहे. दरम्यान, चक्क घोड्यावर बसून नवरी बाईंनी लग्नमंडपात प्रवेश केला. या 'एन्ट्री'ने एका नव्या विचारांची पेरणी केली. सहसा फक्त नवरा मुलगा घोड्यावरून लग्नमंडपात दाखल होतो. मात्र, या परंपरेला छेद देणारे दृश्य नागपूरकरांनी या लग्नाच्या निमीत्ताने अनुभवले. 'आयुर्वेदिक ले-आउट' येथील राजाभाऊ खेडीकर यांची कन्या खुशबूचा विवाह ज्ञानेश्वर सोनोवाले यांच्यासोबत पार पडला. हा सोहळा रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात आयोजित करण्यात आला होता.