नागपूर - शरीर स्वस्थ आणि शहर प्रदूषण मुक्त, असे दोन्ही उद्देश साध्य करताना सायकल महत्त्वाची भूमीका पार पाडत असते. महा मेट्रोतर्फे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि फिडर सर्विस संकल्पना म्हणून सायकल आणि नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट सेवा म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन मेट्रोस्टेशनवर उपलब्ध करून दिले आहे. यामुळे पर्यावरण पूरक मेट्रो प्रवासानंतरही पुढील प्रवास ही सायकल आणि ई- बाईकच्या साह्याने प्रदूषण मुक्त करता येणार आहे. यासाठी मेट्रोकडून 16 कंपन्यांसोबत करार केला आहे.
गेल्या काही वर्षांत उपराजधानी नागपूर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. वाढत्या जनसंख्येसोबत वाहनाची संख्या ही प्रदूषण वाढवत असल्याने शहरासाठी घातक ठरत आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांच्या विशेष प्रयत्नातून इतर मोठ्या शहराना मागे टाकत उपराजधानी नागपूरला महामेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने मेट्रो शहर म्हणून उदयास येत आहे. शहराच्या चहू बाजूने मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यासोबतच नागरिकांनी अधिका अधिक सुविधा देण्यासाठी मेट्रोकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. यातूनच ही संकल्पना राबवत लोकांना घरापासून मेट्रोपर्यंत आणि मेट्रोपासून तुमच्या गंतव्यापर्यंत पोहचता येणार आहे.
तुम्हाला सायकल चालवण्याची आवड असेल तर हा पर्याय उत्तम ठरणार आहे. यासोबत प्रदूषण मुक्त शहराच्या वाटचालीत योगदान सुद्धा देता येणार आहे. शहरातील सर्वच मेट्रो स्टेशनवर जवळपास 650 सायकली मायबाईक या कंपनीकडून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यासोबत शहरातील प्रमुख चार स्टेशनवर बाहेरून नौकरीसाठी दररोज येणाऱ्या प्रवश्यना भाडेतत्त्वावर इ बाईक, काही स्टेशनवर ई-रिक्षा अशा पद्धतीची सोय असणार आहे. ई-बाईक संख्या सध्या कमी असली तरी येत्या काळात वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी यात भर घातली जाणार आहे.