नागपूर -नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारी संचारबंदी असणार आहे. या काळात जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ते विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून, यात रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाची साखळी तोडावी असं राऊत यांनी म्हटले आहे.
नागपुरात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ
नागपुरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. दररोज 10 ते 11 हजार चाचण्या करण्यात येत आहेत. यापैकी सरासरी दररोज एक हजार व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. या रुग्णांना विलगिकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मुंबईच्या खालोखाल नागपूरमध्ये चाचण्यांचा वेग सर्वाधिक असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
नागपूरमध्ये पुढील दोन दिवस संचारबंदी कोरोना स्थितिचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. सध्या स्थितीमध्ये शहरात 1769 ऑक्सिजन बेड, 684 आयसीयू बेड आणि 263 व्हेंटिलेटर बेड आहेत. कोविड मित्र तयार करण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, मी जबाबदार मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन देखील राऊत यांनी केले आहे. 7 मार्चपर्यंत सर्व परिस्थितीचा आढाव घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.