नागपूर - भारतासाठी आनंदाची आणि अंतराळ क्षेत्रात ( Space Area )मोठी भरारी घेणारी ही बातमी आहे. हैदराबादच्या स्कायरूट एरोस्पेस ( Skyroot Aerospace ) या भारतीय कंपनीने पहिले क्रायोजेनीक इंजिनची यशस्वी चाचणी ( Cryogenic Engine Testing ) 25 नोव्हेंबरला घेतली. विशेष म्हणजे नागपूरच्या सोलार कंपनीच्या ( Solar Company ) सहकाऱ्याने प्राथमिक पासून अंतिम टप्पा गाठेपर्यंत महत्वाच्या चाचण्या पार पाडल्या आहेत. धवन 1 ( Dhawan 1 )असे या क्रायोजेनिक इंजिनला नाव देण्यात आले असून यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे. आता अंतराळात रॉकेट सोडताना लागणाऱ्या खर्चावर 40 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.
हैदराबादच्या स्कायरूट एअरोस्पेस कंपनीने ‘मेड इन इंडिया’ क्रायोजेनिक रॉकेट इंजिन विकसित केले. यामध्ये लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच एलएनजी गॅसचा वापर करण्यात आला आहे. भारतीय कंपनीच्या या यशामुळे अंतराळविज्ञान क्षेत्रात मोठे क्रांतीकारी बदल होण्याची आशा वर्तवली जात आहे. रॉकेट इंजिनच्या तंत्रज्ञानात अमेरिका, रशिया, चीन, जपानच्या मोजक्या अंतराळ संस्थांनी वर्चस्व प्रस्थापित केले असताना भारतीय कंपनीने मिळवलेले हे यश मोठे यश मानले जात आहे.
स्वस्त आणि पर्यावरणासाठी मस्त -
इंजिनमध्ये इंधनाचा वापर म्हणून एलएनजी म्हणजेच लिक्विड नॅचरल गॅसचा ( Liquid Natural Gas ) वापर करण्यात आल्यामुळे भविष्यात रॉकेटची उडान ही पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा कमी नुकसान करणारी असणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळले जाणार असून लागणारा खर्च कमी होणार त्यामुळे आर्थिक फायदाही मोठा होणार आहे.