नागपूर- महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर मंगळवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. वर्धा रोडवरील एम्प्रेस पॅलेसजवळ ही घटना घडली. या प्रकरणाची गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा -नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले
महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भाजपच्या आमदारांनी विधान परिषदेत नियम 289 अन्वये मुद्दा उपस्थित केला. आठ दिवसांपूर्वी संदीप जोशी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. पोलिसांनी या तक्रारीवर काय तपास केला? असा प्रश्न भाजप आमदारांनी उपस्थित केला. या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती भाजप आमदार अनिल सोले यांनी दिली आहे.