महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नर्सने राखले प्रसंगावधान; कोरोनाबाधित महिलेची वाटेतच झाली सुखरूप प्रसूती

रुग्णालयात आलेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेला अचानक प्रसुती कळा येऊ लागल्या होत्या. मात्र, लिफ्टपर्यंत पोहोचण्याचाही अवधी नसल्याने शासकीय रुग्णालयातील एका नर्सने कोणतीही पर्वा न करता त्या महिलेची सुखरुप प्रसुती केली आहे. गर्भवती महिला कोरोनाबाधित असल्याने त्यावेळी पीपीई कीट परिधान करने गरजेचे होते. मात्र, त्याक्षणी तिची प्रसुती व्यवस्थीत होणे गरजेचे असल्याने रुग्णालयातील परिचारीका कोणताही विचार न करता मदतीला धावून गेली. आता त्या परिचारीकेस क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सुजाता मून
सुजाता मून

By

Published : Sep 13, 2020, 6:59 AM IST

Updated : Sep 13, 2020, 7:57 PM IST

नागपूर- शहरातील कोव्हिड हॉस्पिटल पैकी एक असलेल्या शासकीय रुग्णालयात एका परिचारिकेने (नर्स) प्रसंगावधान राखत एक कोरोनाबाधित महिलेची सुखरूप प्रसूती केली आहे. सुजाता मून असे त्या नर्सचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे सुजाता या आपल्या कर्तव्यावर जात असताना त्या कोरोनाबाधित महिलेची प्रसूती वाटेतच होत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी सुजाता यांनी क्षणाचाही विलंब न करता लिफ्टच्या बाहेरच त्या महिलेची यशस्वी प्रसूती केली. आई आणि बाळ सुखरूप आहेत. मात्र ऐन वेळेवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना पीपीई कीट सुद्धा घालण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे सुजाता यांना आता क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

नर्सचे प्रसंगावधान... कोरोनाबाधित महिलेची वाटेतच झाली सुखरूप प्रसूती

कोरोनाच्या काळात माणसं माणसापासुन दूरावत आहे. रुग्णालयात देखील हीच परिस्थिती पहायला मिळत आहे. परंतु संसर्गाचा विचार न करता दिवस रात्र झटत आहेत, ते आरोग्य कर्मचारी. एवढेच नाही तर त्यांच्या कार्यातून प्रत्येक वेळी माणूसकीचे दर्शन होते. अशाच माणूसकीचे दर्शन घडविणारी घटना नागपुरात घडली आहे. नागपुरातील शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित महिला उपचारासाठी आली. ती गर्भवती असल्याने अचानक प्रसूतीच्या कळा तिला जाणवू लागल्या. परंतु ती महिला कोरोना बाधित असल्याने जवळ जाणार कोण? आजू बाजूला कोणीही नव्हते. अशातच याच रुग्णालयात परिचारीका म्हणून कार्यरत असणाऱ्या सुजाता मून यांना ती गर्भवती महिला प्रसुतीच्या कळा सोसत असल्याचे दिसून आले. परंतु महिला कोरोनाबाधित असल्याने जवळ जावं कसे? हा विचार न करता सुजाता यांनी माणुसकीचे दर्शन घडवत त्या महिलेस मदत करण्यासाठी धाव घेतली.

प्रसुतीच्या कळा अधिकच तीव्र होत असल्याचे सुजाता यांच्या लक्षात आले. मात्र महिला दुसऱ्या खोलीत हलवण्या एवढा इतका वेळ नसल्याने सुजाता यांनी कोणताही विचार न करता त्याच ठिकाणी त्या महिलेची यशस्वी प्रसुती करत आई आणि बाळाला सुखरूप वाचवण्याचे काम केले. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र सुजाता यांचे कौतुक केले जात आहे.

प्रसुती झालेली महिला कोरोनाबाधित आहे, आपण जवळ कसे जावे हा विचार त्यावेळी सुजाता यांनी केला असता, तर माणुसकी हा शब्द फक्त सांगण्यापूरताच उरला असता. त्यामुळे कोरोनाचं संकट कितीही मोठं असलं तरी माणूसपण जोपासता येऊ शकते. याची प्रचिती परिचारिका सुजाता यांच्या या कार्यातून दिसून आली. परिचारिका सुजाता मून यांनी या घटनेनंतर स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात सुजाता यांचे हे कार्य खऱ्या कोरोना योद्धाचे दर्शन घडवणारे आहे.

Last Updated : Sep 13, 2020, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details