नागपूर : दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणारी अतिवृष्टी, त्यामुळे जीर्ण घरे पडणे, रस्त्यांवरील झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचून राहणे, अशी परिस्थिती निर्माण होत असते. या सर्व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण तयारीचे नियोजन : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत लवकर मदत पोहोचली जावी, यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासकांच्या देखरेखीत संपूर्ण यंत्रणा कार्य करीत आहे. शहर स्तरावरील घटना प्रतिसाद प्रणालीचे ‘इन्सिडेंट कमांडर’ अतिरिक्त आयुक्त (शहर) हे आहेत. या प्रणालीचे नियोजन विभागप्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना जबाबदारी देण्यात आली आहे. घटना प्रतिसाद प्रणालीअंतर्गत ऑपरेशन सेक्शन चिफ मुख्य अग्निशमन अधिकारी असून, त्यांच्या नियंत्रणात रिस्पॉन्स ब्रँच हेड कार्यरत आहेत. एकूणच येणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण तयारीचे नियोजन केले आहे. यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.