नागपूर - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नागपूर शहरातील ९ भागांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. प्रशासनाकडून शहरात नऊ कॅन्टोन्मेंट झोन तयार करण्यात आले होते. त्यापैकी 4 झोनमध्ये गेल्या १४ दिवसांच्या कालावधीत नवीन रुग्ण आढळून न आल्याने त्या भागातील बंधने उठवण्यात आली आहेत. आता केवळ पाच परिसरच सील असल्याची माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सर्वेक्षण करताना देखील नागरिक स्वतःहुन माहिती देत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा धसका; नागरिक कोरोनाबाबत स्वतःहुन माहिती देत नसल्याने तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली खंत
महापालिका प्रशासनाने लाखो घरांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. मात्र सर्वेक्षण करताना देखील नागरिक स्वतःहुन माहिती देत नसल्याची खंतही तुकाराम मुंढेंनी खंत व्यक्त केली आहे.
नागपूर शहरात पहिला रुग्ण पुढे आल्यापासून महापालिका प्रशासनाने आक्रमक होऊन लाखो घरांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. प्रतिदिवसाला आठ हजार घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. या अंतर्गत 83 हजार नागरिकांच्या आरोग्याची चौकशी केली जात आहे. कुणाला सर्दी,खोकला आणि ताप आहे का याची पडताळणी केली जात आहे. मनपाने सुरू केलेल्या आरोग्य सर्वेक्षणासाठी 24 डॉक्टरांच्या नेतृत्वात २७१ पथके कार्यरत असल्याची माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. ज्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे, त्या भागातील लोकांनी स्वतःहून आरोग्य सेवकांना मदत करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.