नागपूर -राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोना रुग्णांची ( Corona Patient Increase In Nagpur ) संख्या धक्कादायकरित्या वाढू लागली आहे. दरदिवशी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. एवढेच नाही, तर ओमायक्रॉनबाधित रुग्णसंख्यादेखील (omicron In Nagpur ) हळूहळू वाढत आहे. नवीन वर्षातील सात दिवसांत कोरोना बधितांची रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. शुक्रवारी झालेल्या एकूण चाचण्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या यांचा ताळमेळ जुळवला असताना नागपुरचा पॉझिटिव्हीटी रेट १० ( Nagpur Corona Positivity Rate ) टक्यांच्या जवळ गेल्याचे धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. धक्कादायक म्हणजे १ जानेवारीला नागपुरात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा केवळ १.३१ टक्के इतकाच होता. मात्र, दहा दिवसांत सरासरी पाच हजार चाचण्या होत असल्याने पॉझिटिव्हीटी रेट मात्र ९.३० टक्के इतका झाला आहे. ही वाढलेली आकडेवारी नागपूरसाठी अत्यंत धोकादायक ठरणारी आहे.
ओमायक्रॉनचे अर्धशतक पूर्ण -
नवीन वर्षाचे आगमन कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुभावासह झाले आहे. एक जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली होती. ती सातव्या दिवशीदेखील कायम आहे. या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ हजारांच्या पुढे गेली आहे. तर ओमायक्रॉन रुग्णसंख्येने अर्धशतक पूर्ण करून शतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. ज्यावेगाने रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हीटी रेट वाढतो आहे, ते बघून सर्वांच्या मनात धडकी भरणारे आहे.