महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 14, 2020, 1:16 PM IST

ETV Bharat / city

परवानगी विना रस्ता खोदणाऱ्या कंत्राटदाराला तुकाराम मुंढेंचा झटका, आकारला लाखोंचा दंड

परस्पर रस्ता खोदणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराला मनपाने एक लाख ९२ हजारांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे नोटीस दिल्यानंतर काही वेळातच संबंधित कंत्राटदाराने दंडाच्या रकमेचा भरणा केला आहे.

मनपाच्या परवानगीविना रस्ता खोदला म्हणून वीज कंपनीच्या कंत्राटदाराला लाखोंचा दंड
मनपाच्या परवानगीविना रस्ता खोदला म्हणून वीज कंपनीच्या कंत्राटदाराला लाखोंचा दंड

नागपूर- शहरातील रस्त्याचे खोदकाम करताना कुठल्याही शासकीय अथवा खासगी एजन्सीने महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, परवानगीचे सोपस्कार पार न पडता परस्पर रस्ता खोदणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराला मनपाने एक लाख ९२ हजारांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे नोटीस दिल्यानंतर काही वेळातच संबंधित कंत्राटदाराने दंडाच्या रकमेचा भरणा केला आहे.

यासंदर्भात मनपाच्या अधिकृत 'नागपूर लाईव्ह सिटी ऍपवर तक्रार प्राप्त झाली होती. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून मंगळवारी झोनतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रभाग क्र. ९ मधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमागील गणेश मंदिराजवळ वीज वितरण कंपनीचे ठेकेदार गोविंद इलेक्ट्रिकल आणि डेव्हलपर्सचे संचालक सचिन भेंडारकर यांनी ६० मीटर लांबीचा रस्ता खोदला. यासाठी मनपाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असतानाही तसे न करता परस्पर काम सुरू केले. यासंदर्भात एका नागरिकांकडून ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. त्यावरून मंगळवारी झोनकडून त्या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली होती.

अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस -

प्रति मीटर १६०० रुपये याप्रमाणे ९६ हजार रुपये आणि तेवढाच दंड असे एकूण एक लाख ९२ हजार रुपयांचा भरणा करण्यासंदर्भात नोटीशीत नमूद केले होते. त्यानंतर काही वेळातच कंत्राटदारांने सदर रकमेचा भरणा केला. यापुढे मनपा हद्दीत विनापरवानगीने कुठलेही खोदकाम करू नये. विनापरवानगीने कार्य करणाऱ्या कुठल्याही एजन्सीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. एवढंच नाही तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांना मुंढे यांनी 'कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सर्व झोनचा अहवाल तातडीने द्या-

मंगळवारी झोनअंतर्गत ही तक्रार होती. परंतु विनापरवानगी अशी कामे जर झोन क्षेत्रात होत असतील तर त्यावर अभियंत्यांनी लक्ष द्यायला हवे आणि तातडीने नोटीस बजावायला हवी. मात्र, अभियंत्याने कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे यासाठी मंगळवारी झोनचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाय सर्व झोनच्या अभियंत्यांनी अशा कामांचा अहवाल तातडीने द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details