नागपूर -इलेक्ट्रिक दुचाकी घेताना गाडीच्या बॅटरीची क्षमता किती आहे. गाडीची वेगमर्यादा किती आणि त्या गाडीची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करावी लागेल. या संदर्भात सर्व माहिती घेतल्यानंतरच गाडी घेण्याचा अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा तुमच्यावर सुद्धा डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येईल. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ( Nagpur City Regional Transport Office ) अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या मोहिमेत 50 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक दुचाकी ( Electric bike Issue ) जप्त केल्या आहेत. ज्याची वेळ मर्यादा 25 किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक आढळून आली आहे. शिवाय या गाड्यांची नोंदणी सुद्धा ( Unregistered electric bike ) आरटीओ कार्यालयात नाही. वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी विक्रेत्यांवर 1 लाख रुपयांचा दंड आरटीओ कार्यालयाने लावला आहे. तर ग्राहकांना देखील 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
पेट्रोलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक (बॅटरी) चलीत दुचाकी गाड्या ग्राहकांच्या पसंतीला उतरू लागल्या आहेत. गेल्या वर्षभराच्या कालखंडात एकटया नागपूर शहरात आणि जिल्ह्यात हजारांच्या वर इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांची विक्री झाली आहे. या गाड्यांना प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी करण्याची गरज नाही. हेल्मेट किंवा वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) देखील गरजेचे नसल्याने नवीन वाहन खरेदी करण्याचा बेत असलेले ग्राहक आपसूकच इलेक्ट्रिक दुचाकीकडे वळतात. साधारणपणे गेल्या दोन ते तीन वर्षात ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढलेला आहे. मात्र, मोटार वाहन कायद्याची फारसी माहिती ग्राहकांकडे उपलब्ध नसल्याने नेमका याच अज्ञानतेचा गैरफायदा घेऊन इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक सुरू केली आहे. नियमानुसार प्रतितास 25 किलोमीटर अंतर धावेल अशा गाड्यांना आरटीओच्या नोंदणीची गरज नाही. मात्र, वाहन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी ग्राहकांना कोणतीही सूचना किंवा माहिती न देता प्रति तास 30 ते 50 किलोमीटर अंतर धावणाऱ्या गाड्यांची विक्री केली आहे. बॅटरीच्या क्षमतेपेक्षा अधिक वेगाने गाड्या पळत असल्याने आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात शेकडो गाड्या नियमांच उल्लंघन करून धावत असल्याचे पुढे आले आहे.
काय आहेत नियम? :इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करताना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ची नोंदणी नको. हेल्मेट नको आणि लायसन्सची सुद्धा आवश्यक नाही. केवळ आपल्या सोयीचे नियम लोकांना माहिती आहेत. मात्र इलेक्ट्रिक दुचाकीची वेगमर्यादा 25 किलोमीटर प्रति तासा पेक्षा अधिक असेल तर त्या गाडीची आरटीओकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. शिवाय हेल्मेट आणि लायसन्स असणे देखील आवश्यक आहे. कोणतेही इलेक्ट्रिक वाहन विक्री करण्यापूर्वी नोंदणीकृत टेस्टिंग एजन्सी असलेल्या एआरएआय, आयकॅट, सीआयआरटी या संस्थांकडून टाईप अपूर्वल टेस्ट रिपोर्ट घेणे अनिवार्य आहे.