नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात ( Torrential Rains in Gadchiroli ) सध्या पूर परिस्थिती ( Gadchiroli district is currently flood situation ) निर्माण झालेली आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) आज गडचिरोलीच्या दौऱ्याकरिता नागपूरवरून रवाना झाले. नागपुरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वातावरण खराब झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे रस्ते मार्गानेच गडचिरोलीसाठी रवाना झाले आहेत.
गडचिरोलीत तीन दिवस मुसळधार : जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाने (Gadchiroli Heavy Rains) कहर केला असून याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली सिरोंचा आहेरी तालुक्याला बसला आहे. मुख्यालय मार्गावरील नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली, तर गडचिरोलीला आजपासून पुढील तीन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री घेणार विभागीय आयुक्तांच्या बैठका : गडचिरोलीला पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे करणार आहेत. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पूर परिस्थितीच्या आढावासंदर्भात आम्ही स्थानीय विभागीय अधिकारी, आयुक्तांच्यासोबत बैठक घेणार आहोत. त्यानंतर पूरपरिस्थिवरील नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहे. आमची तेथील स्थानीय यंत्रणा अलर्ट आहे, आम्ही त्यांच्यासोबत सतत संपर्कात आहोत. आता त्यासाठी आम्ही येथून निघणार आहोत. पुरामुळे कोणतीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन स्थानीय प्रशासनाला केले आहे.
पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश :आम्ही स्थानीय प्रशासनाला पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांची कुठल्याही जीवित आणि मालमत्तेची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासंबंधी एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी, एअर फोर्स यांचे सहकार्य घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याचे कार्य चालू आहे. आम्ही या संदर्भात एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी, एअर फोर्स यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
पूर परस्थितीवर प्रशासनाचे लक्ष : गडचिरोली रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, गडचिरोलीमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर शासन आणि प्रशासनाचे लक्ष आहे. त्यामुळेच आज गडचिरोली येथे सर्व विभागांच्या बैठका घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. गडचिरोलीला सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका ही शासनाची असेल, असेदेखील ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यातदेखील इतर ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, त्या ठिकाणीदेखील आमचे लक्ष असल्याचे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती :
पुणे :पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणामध्ये सुमारे 61 टक्के, पानशेत धरणामध्ये 34 टक्के आणि वरसगाव धरणामध्ये 22 टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा 0.93 टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साठत आहे. त्यामुळे शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.