नागपूर - शिवसेनेतील मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात येत आहे, यावर प्रश्न विचारला असता यात पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणे उचित नसल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले. पण मुख्यमंत्री हे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. या प्रकरणाविषयी अधिकृत माहिती तेच सांगतील. या मुद्द्यावर आक्रमक होणाऱ्या भाजपवर केदार यांनी टीका केली. सुनील केदार नागपुरात जिल्हा परिषदेच्या परिसरात फिरते पशुवैद्यकीय वाहनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
संजय राठोड प्रकरणात होत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री बोलतील. पण भाजपकडून या प्रकरणावर राजकारण केले जात आहे. यावेळी भाजपच्या राज्यात गाजलेल्या प्रकरणाची आठवण करून देत जोरदार टीका पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली.
पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री अधिकृत माहिती घेऊन बोलतील - सुनील केदार - पूजा चव्हाण प्रकरण
शिवसेनेतील मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात येत आहे, यावर प्रश्न विचारला असता यात पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणे उचित नसल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याविषयी अधिकृत माहिती देतील असेही केदार यावेळी म्हणाले.
लोकशाहीत टीकेसोबत शाब्बासकी देण्याचीही मानसिकता बनवा -
लोकशाहीत विरोधी पक्षाने त्यांची भूमिका ठेवावी. शासन चुकत असले तर विरोधी पक्ष म्हणून लक्षात आणून द्यावे. पण निव्वळ टीका करून होत नाही. पण कधीतरी चांगल्या कामाबद्दल बोलण्यासाठी पुढे आले पाहिजे. शासन चांगले काम करत असेल तर त्यावेळी शाब्बासकी देण्याची मानसिकता त्यांनी दाखवावी, असे ते म्हणाले.
सरकारने कोरोना महामारीतही काम केले -
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले तेवढ्यात कोरोना आला. या काळातही अत्यंत चांगल्या प्रकारे काम महाविकास आघाडी सरकारने केले. केंद्राने जीएसटीचे पैसे दिले नसताना राज्य सरकारने योग्य प्रकारे आर्थिक गाडा हाकला. या काळात कोणतीही योजना बंद केली नाही, पगार थांबले नाहीत आणि गरीब व सामान्य जनतेला मिळणारी औषधेही बंद केली नाहीत.