नागपूर -ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने नेमलेल्या आयोगा मार्फत सुरू झाले आहे. मात्र, अत्यंत चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा केला जात असल्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, अशी भूमिका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष असल्याचे मान्य केले आहे. यावर आज ( मंगळवारी ) भाजपाचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सुरुवातीलाच सांगितले होते की राज्य सरकार ( State Government ) ओबीसी आरक्षणाच्या ( OBC Reservation Imperial Data ) मुद्यावर टाईमपास करत आहे. हे सरकार अनेकदा याच मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात तोंडघशी पडलेले असताना देखील सदोष पद्धतीने ओबीसींचा डेटा गोळा केला जातो आहे, तर मग सरकारचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे ( OBC leader Chandrasekhar Bavankule ) यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे आयोग चुकत असताना दुसरीकडे राज्याचा दौरा करून काय साध्य होणार आहे? असा प्रश्न देखील बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. एका आडनावाचे अनेक समाजात लोक असतात मग आडनावाच्या आधारे ओबीसींचा सदोष डेटा गोळा करून सरकार ओबीसी समाजाचे नुकसानच करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आयोगाची अशीच कार्यपद्धती राहिल्यास हे सरकार पुन्हा तोंडघशी पडेल, असे देखील बावनकुळे म्हणाले.