नागपूर -गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भाच्या प्रत्येक भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळ भाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत. कोणत्याही जिल्हाच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुद्धा केलेला नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार केवळ राजकारणात व्यक्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भाला अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे, याची कल्पना देखील देण्यात आली की नाही? अशी शंका भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरच्या प्रेस क्लबमध्ये बोलत होते.
मागील दीड दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात आणि संपूर्ण विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभा पिकांना प्रचंड नुकसान झालेले आहे. गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असताना राज्य सरकार मात्र जाणीवपूर्वक या कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
'तत्काळ 50 हजार हेक्टरी मदत जाहीर करा'