नागपूर - भाजपची जन आशीर्वाद यात्रा इतकी किरकोळ वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेण्याची काय आवशकता होती. एकेकाळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण आजच्या घडीला ज्या पद्धतीने कोकणात जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे, तो सेनेचा गड आता ढासळत चालल्याचा संकेत आहे. असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यामुळे मुख्यमंत्री हे काहीही बोलू शकतात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते नागपुरात रामदासपेठ येथे माध्यमांशी बोलत होते.
महाआघाडी सरकारने गेल्या दीड वर्षांपासून लोकांना घरात डांबून ठेवले आहे. सरकारने नियम ठरवावे पण तुम्ही मंदिरात जाऊ नका, गणपती मांडू नका, दहीहंडी फोडू नका, इकडे जाऊ नका. तिकडे जाऊ नका अशा प्रकारचे निर्बंध लादणे चुकीचे आहे. लोक वेडे व्हायला लागले आहेत आता घरात राहून. उत्सव छोट्या प्रमाणात साजरा करा, हे म्हणणे ठीक आहे. पण उत्सवच साजरा करू नका, असे म्हणणे चुकीचे आहे. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, केवळ सत्ता टिकवण्याचा हास्यास्पद प्रकार - महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेली नाही. पूर्वीची शिवसेना असती तर टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली नसती, उर्दू कॅलेंडर काढून आम्ही कशा पद्धतीने अल्पसंख्यांकच्या बाजूने आहोत हे सहकारी पक्षांना दसखवून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो हास्यास्पद असल्याची टीका सेनेवर केली. हा सगळा प्रकार सत्ता टिकवण्यासाठी चालला आहे, असेही ते म्हणाले.
कर नाही तर डर कशाला, होऊ द्या चौकशी -
ईडी लावली म्हणून त्याची भीती वाटण्याची गरज नाही, कर नाही तर डर कशाला. पण ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्यांनी या संस्था निर्माण केल्या त्यांच्यावर आक्षेप आहे का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. या संस्था घटनेनुसार त्यांचे काम करत राहतील. त्या उगाच कोणालाही हात लावत नाहीत. दिवाकर रावते यांना कशाला हात लावतील. ज्या पद्धतीने अनिल देशमुख दिवसभर बडबडले क्लीन चिट दिली म्हणून मात्र सीबीआयने चपराक लगावताच सगळे बिळात लपून बसले. यामुळे ज्याला कर नाही त्याला डर नाही.
सुप्रिया सुळे म्हणतात ईडीचा राष्ट्रवादीला फायदाच होणार -
असे असेल तर ईडी लावली म्हणून काळजी करू नका, त्या ऐवजी पेढे वाटा. ईडी आणि सीबीआयचा उपयोग इंदिरा गांधी यांनी किती वेळा केला यावर पुस्तक लिहिता येऊ शकेल. राष्ट्रपती राजवट किती वेळा आणली यावरही पुस्तक लिहिले जाऊ शकेल. पण सुप्रियाताईंना हा इतिहास माहीत नसेल. त्यांनी शरद पवार यांना विचारावे. पण आज मोदीजी आणि अमित शाह हें काही कोणाला संपवत नाहीत. तुम्ही पैसे खायचे आणि चौकशी पण करू द्यायची नाही. चौकशी होऊ द्या जर त्यात काही केले नसेल तर निर्दोष सुटाल, असे पाटील म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात आरोप सिद्धीचे प्रमाण 52 टक्क्यावरून 8 टक्क्यांवर -
ठाण्यात महिल्या अधिकाऱ्यावर फेरीवाल्याकडून झालेल्या हल्ल्यासंदर्भात विचारले असता या राज्यात कायद्याचे राज्य राहिले नाही. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर चार चार वारंट निघतात. संपत्ती जप्त होते पण त्यांना अटक होत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात दोष सिद्ध होण्याचा दर 52 टक्क्यांवर होता. तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात 8 टक्क्यांवर आला आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.