नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला खासगीत सांगितले की मी फडणवीसांची चांगलीच जिरवली आहे. पुढेही जिवणार, असे वक्त्यव्य मंत्री विजय वडेट्टीवार केले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मी वडेट्टीवार यांनी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोलाही केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.
एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा - गडकरी
फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले, त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हणाले.