नागपूर - शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धारीवाड लेआउटमध्ये एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याच घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. सिद्धार्थ तुळशीराम गायकवाड असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. सिद्धार्थ यांच्या मृतदेहाच्या गळ्याभोवती दोर आवळला होता. मात्र मृतदेह हा खाली झोपलेल्या अवस्थेत असल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी घरातील सर्व सदस्य हे घरातच झोपलेले होते. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर अजनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने डीसीपी नुरुल हसन हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
सिद्धार्थ गायकवाड हे फेब्रिकेशनच्या कारखान्यात काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक अवस्था बरी नव्हती, अशी माहिती त्यांच्या शेजारच्यांनी दिली आहे. आज (बुधवारी) सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास सिद्धार्थ यांची पत्नी त्यांना उठवण्यासाठी समोरच्या खोलीत आले असता त्यांना त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यांनी घरातच झोपलेल्या मुलीला आणि मुलाला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.