नागपूर - कोरोनामुळे बडग्या मारबत उत्सव साजरा करण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहे. मात्र, परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी उद्या ५ लोकांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने मारबतीचे पूजन करण्यात येणार आहे. पिवळी मारबत स्थानापन्न झाली असली तरी मिरवणूक निघणार नाही. त्यामुळे भाविक दर्शनासाठी पोहचू लागले आहेत. पिवळी मारबत म्हणजे चांगल्या परंपरेचे प्रतिक आहे. वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून घालवण्यासाठी देखील नागपूरकर पिवळ्या मारबतची पूजा करतात.
मारबत आणि बडग्या हा जगातील एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच पार पाडतो. मात्र, कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच तान्हा पोळ्याला म्हणजेच उद्या निघणारी मारबत-बडग्याची मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परंपरेबरोबर सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणारा मारबत-बडग्या उत्सव यंदा मिरवणूकीशिवाय नागपूरकरांना अनुभवावा लागणार आहेत. रोगराई, समाजातील अनिष्ट रुढी, लोकांच्या 'ईडा पिडा घेऊन जा गे मारबत' अशी आरोळी देत दरवर्षी नागपूरकर पाडव्याच्या दिवशी मोठ्या उत्साहाने काळ्या आणि पिवळ्या मारबतची मिरवणूक काढातात.