नागपूर :अघोषितपणे सुरू असलेल्या भारनियमनाच्या विरोधात ( Load Shedding In Nagpur ) भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपूरच्या संविधान चौकात कंदील मार्च काढण्यात ( BJP Lantern March In Nagpur ) आला. यावेळी नागपुरातील भाजपचे अनेक आमदार आणि स्थानिक नेते उपस्थित होते. राज्यातील वीज टंचाईच्या समस्येला ऊर्जा विभाग आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
राज्यात अघोषित भारनियमनाचे सत्र सुरू आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, राज्याच्या काही भागात तब्बल सहा तास वीज नसल्याने जनता बेहाल झाली आहे. असे असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशाला कात्री लावण्याचा राक्षसी निर्णय घेतला आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ही सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.