नागपूर -वाढीव वीज बिलांच्या विरोधात उद्या भाजपकडून राज्यभरात हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे. उपराजधानी नागपुरात देखील विविध ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली आहे. शहरात तब्बल नऊ ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केले जाणार असून सुरुवातीचे पहिले आंदोलन सकाळी ९ वाजता कोराडी वीज निर्मिती केंद्राच्या बाहेर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात केले जाणार असल्याची माहिती दटके यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला. त्यावेळी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी वीज बिलांमध्ये सवलत देण्याची घोषणा केली होती. या शिवाय शंभर युनिट फ्री देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र ऊर्जा मंत्रालयाला या सर्व घोषणांचा विसर पडलेला आहे. त्याची देखील आठवण करून देण्यासाठी उद्या राज्यभर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली आहे.