नागपूर -महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे नेहमीच गरम असते. मग ते राज्यस्तरीय राजकारण असे अथवा पक्षीय राजकारण, नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात आता विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत भाजपचे विदर्भातील उगवते नेतृत्व आणि नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर प्रविण दटके यांच्या नावाचा आश्चर्यकारकरित्या समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा...विधानपरिषद निवडणूक : भाजपचा खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी
विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि वर्तमान शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून विधानपरिषदेवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागणार हे पक्के मानले जात असतानाच प्रविण दटके यांच्या नावाची आश्चर्यकारक घोषणा करून, भाजपने पुन्हा एकदा बावनकुळे यांचा पत्ता कट केला आहे.