महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तुकाराम मुंढेंविरुद्ध भाजप आमदारांची फौज मैदानात, उपायुक्तांनी कारवाई न केल्याने पोलीस आयुक्तांकडे तक्रार - tukaram munde news

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैली संदर्भात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात बघायला मिळत आहे.

nagpur
तुकाराम मुंढेंविरुद्ध भाजप आमदारांची फौज मैदानात

By

Published : Jun 30, 2020, 4:47 PM IST

नागपूर - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध नागपूरच्या भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. सुमारे दहा दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराकडे लक्ष वेधणारी तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या संदर्भात काहीही कारवाई न झाल्याबद्दल आक्षेप नोंदवत आज भाजपच्या आमदारांनी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांना भेटून तक्रार दिली आहे. यावेळी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, अनिल सोले, गिरीश व्यास, नागो गाणार आणि प्रवीण दटके उपस्थित होते.

प्रवीण दटके - आमदार, भाजप

हेही वाचा -संत मुक्ताईंच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान; हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली अवघी मुक्ताईनगरी

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैली संदर्भात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात बघायला मिळत आहे. २१ जून रोजी नागपूरचे महापौर आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक संदीप जोशी आणि दुसरे संचालक आणि महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी पोलीस उपायुक्तांकडे तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराकडे लक्ष वेधणारी तक्रार दाखल केली होती.

स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सरकारच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करण्यात आली. महापालिका आयुक्त मुंढे हे या कंपनीत बोर्ड ऑफ डायरेक्टर व सीईओ म्हणून स्वतः हून नियुक्त झाले आहेत. वास्तविक पाहता बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मान्यतेनंतरच नव्या सदस्याचे संचालक मंडळात समावेश केला जातो, परंतु 31 डिसेंबरनंतर संचालक मंडळाची एकही बैठक न होता आयुक्त तुकाराम मुंढे हे बेकायदेशीररीत्या संचालक मंडळ सदस्य व सीसीओ झाले. शिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाचे बँकेत असलेली 18 कोटींची ठेवीची रक्कम 2 खासगी कंत्राटदारांना वळत्या करण्यात आल्याचा आरोपही महापौर संदीप जोशी यांनी केला. शासनाच्या बँकेतील ठेवी आयुक्त मुंढे यांनी नियम धाब्यावर बसवून तोडण्यात आल्याचा आरोप महापौरांनी केला.

घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्रदान करण्यात आलेले 42 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करून 50 कोटीं रुपयांचे नवे कंत्राट काढल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संदीप जोशी यांनी करत पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीला दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही या संदर्भात काहीही कारवाई न झाल्याबद्दल आक्षेप नोंदवत पोलीस विभागाच्या कार्यशैलीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी तक्रार आज नागपूरच्या भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांकडे सादर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details