नागपूर -एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांसह अपक्ष दहा आमदारांना आता मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. या यादीत नागपूर जिल्हाच्या रामटेक विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना समर्थीत आमदार आशिष जयस्वाल यांचा देखील समावेश आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे यावेळी मंत्रिपद नक्की मिळेल अशी आशिष जयस्वाल यांना आशा आहे. मात्र दुसरीकडे आशिष जयस्वाल यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका अशी मागणीचे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली ( BJP Leader On MLA Ashish Jaiswal ) आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आशिष जयस्वाल यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भाजपच्या नेत्यांनी घेतला बंडाचा झेंडा हाती - आमदार आशिष जयस्वाल यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा पूर्वीच शिंदे गटाच्या आमदाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजप नागपूर जिल्हा ग्रामविकास आघाडीचे जिल्हा प्रमुख राजेश ठाकरे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.
आशिष जयस्वाल यांच्यावर कोणते आरोप केलेत -भाजपचे नेते राजेश ठाकरे यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते खनीकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी रॉयल्टीच्या नावावर खनिज संपदेची मोठी लूट केली. शेतातून माती मिश्रित रेती काढण्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्यांनी नदीलगतच्या जमिनी नातेवाईक आणि निकटवर्ती यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. शासनाचा 150 कोटी रुपयांचा महसूल जयस्वाल यांनी बुडवला असा आरोप करण्यात आला आहे.