नागपूर - कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यात लाखो गरीब कुटुंब अडचणीत सापडले आहेत. अशावेळी राज्य सरकार कोट्यवधींचा निधी बँकेत सडवत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
खनिकर्म निधीतून गरिबांच्या समस्या सोडवणे शक्य - चंद्रशेखर बावनकुळे - BAVANKULE NEWS
२४ तासात कोट्यवधींचा हा निधी बँकेतून काढून कोरोना विरोधातल्या लढ्यात लोकांच्या कामासाठी वापरावा अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यातील खनिकर्म महामंडळाचा निधी वापरावा आणि त्यामधून कोरोनाग्रस्त जिल्ह्यामध्ये गरीबांना मास्क, सॅनिटायझर, दोन वेळचे जेवण द्यावे असा स्पष्ट जीआर २८ मार्चला काढला होता. त्यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारने पत्रही पाठवले होते. मात्र, राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात खनिकर्म महामंडळाकडे कोट्यवधींचा निधी आहे. त्या त्या जिल्ह्यात उत्खनन होणाऱ्या खनिजाच्या रॉयल्टीमधून हा निधी जमा होत असतो. एकट्या नागपूर जिल्ह्यात खनिकर्म महामंडळाचे ११८ कोटी रुपये बँकेत आहेत. मात्र, केंद्राचा जीआर असूनसुद्धा राज्याचे जिल्हाधिकारी त्याचा वापर करत नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. २४ तासात कोट्यवधींचा हा निधी बँकेतून काढून कोरोना विरोधातल्या लढ्यात लोकांच्या कामासाठी वापरावा अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.