नागपूर -पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात महाविकास आघाडी गंभीर नसल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. एकीकडे मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचा बोनस अद्यापही धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. तर दुसर्या बाजूला मे महिना संपत आलेला असताना देखील उन्हाळी धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिवसरात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात, त्यांनी सर्वात आधी स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला देखील बावनकुळे यांनी दिला आहे.
शासनाने उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना आपले धान व्यापाऱ्यांना विकावे लागेल. व्यापारी देखील संधीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांचे धान कमी दरात खरेदी करतील, त्यानंतर तेच धान व्यापारी समर्थन मूल्याच्या आधारावर सरकारला विकतील, असा आरोप बावनकुळे यांनी केला. विद्यमान सरकारमधील नेते धानाच्या खरेदी संदर्भात शेतकऱ्यांचे नाही तर व्यापाऱ्यांचे हित जोपासत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.