नागपूर- भारतीय जनता पक्षातर्फे आज नागपूरसह संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन करण्यात आले. नागपूर शहरातील व्हेरायटी चौकातसुद्धा ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र बहुतांश लोकांनी कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या त्रिसूत्री नियमांना अक्षरशः तिरांजली दिल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भांत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने भाजप कार्यकर्त्यांना विचारणा केली तेव्हा अनेकांकडून धक्कादायक उत्तरे ऐकायला मिळाली. त्यामुळे आपल्या देशात जीवघेणा कोरोना अस्तित्वात आहे की नाही असाच प्रश्न पडला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र लोकांना कोरोनाच्या दहशतीचा विसर पडल्याचे धक्कादायक चित्र आज नागपुरात पाहायला मिळत आहे. त्यातच आज भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असल्याने हजारो भाजप कार्यकर्ते नागपूरच्या व्हेरायटी चौकात एकत्र आले होते. या वेळी नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा पार विसर पडला होता. सामाजिक अंतर म्हणजे काय असाच प्रश्न बिचाऱ्या कोरोनाला पडला असेल. भाजप कार्यकर्त्यांच्या या जीवघेण्या गर्दीत आलेल्या अनेकांनी तर मास्कसुद्धा घालण्याची तसदी घेतली नाही. एकीकडे भाजप नेते लोकांना मास्क घालून सामाजिक अंतर राखण्याचे राखण्याचे आवाहन करत होते. मात्र कार्यकर्ते जणू त्यांचे कोरोना काहीही वाकडं करू शकतं नाही या अविर्भावात वावरत होते.
मास्क घालायला काय अडचण आहे, वाचा कारण -
आज हजारो नागरिक भाजपच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यापैकी तरुण वर्गात अतिशय जास्त उत्साह संचारला होता. बऱ्याच दिवसांनी राजकीय आंदोलन करण्याची संधी मिळाल्याने नारे देताना बेंबीच्या देठापासून आवाज निघत होता. त्याच वेळी या कार्यकर्त्यांकडे मास्क संदर्भात विचारणा केली तेव्हा उडवा उडवीचे उत्तर देत आपली चूक झाकण्याचा यशस्वी प्रयत्न करत होते. कुणी म्हणलं की घाम आल्याने मास्क ओला झाला तर कुणाचा श्वासच कोंडला जात होता. काहींनी तर मास्क घातल्याने उच्च रक्त दाबाचा त्रास होत असल्याचं कारण दिलं.