नागपूर- महाराष्ट्रात नैसर्गिक संकटाने आलेल्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते आणि पूल खराब झाले आहे. पण आता नवे रस्ते बांधताना पुढच्या पिढ्यांसाठी टिकले पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने ते केले पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीची गरज असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते नागपुरात महारेलच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
उत्तर नागपूर महत्त्वाकांक्षी कडबी चौक ते गोळीबार चौकात १४६ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाण पुलाचे शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. महाराष्ट्र राज्य रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने ( महारेल ) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, राजू पारवे, कृष्णा खोपडे, मोहन मते, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, जिल्हाधिकारी विमला आर.उपस्थित होते.
संबंध नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज पद्धतीने वाढत राहील असेही ते म्हणाले
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक करत भाषणात सुरुवात केली. समृद्धी महामार्गामुळे राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जवळ येत आहे. विकास कामात राजकीय अडथळे येऊ न देता विकास कामासाठी सोबत येऊ ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे संबंध नॅरोगेज ऐवजी नेहमी ब्रॉडगेज पद्धतीने वाढत राहील, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणालेत.